
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : वन विभागाने आयोजित केलेल्या पक्षिमित्र संमेलनाला निसर्गप्रेमी आणि पक्षिमित्रांचा उदंड प्रतिसाद लाभला. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित सादरीकरणातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. विशेषतः गिधाड संवर्धनावर आधारित 'कल्चर्ड वल्चर' (सुसंस्कृत गिधाड) या संगीत नाटकाने या संमेलनात मनोरंजनातून प्रबोधनाचा नवा आदर्श निर्माण केला.
संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता काल, दि. २२ फेब्रुवारी रोजी वन्यवाणी फाऊंडेशन प्रस्तुत आणि कुणिका बनसोडे-सावंत निर्मित 'सुसंस्कृत गिधाड' या नाटकाने झाली. मकरंद भास्कर सावंत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाने गिधाडांचे महत्त्व अधोरेखित केले. रामायणातील जटायूचा संदर्भ देत, गिधाड शिकार न करता केवळ मृत प्राण्यांवर आपली उपजीविका करते आणि पर्यायाने पर्यावरणाचे 'स्वच्छता दूत' म्हणून काम करते, हा मोलाचा संदेश यातून देण्यात आला. डायक्लोफिनॅकच्या वापराने मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडांची संख्या कमी होत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.
नाटकातून केवळ निसर्गसंवर्धनच नव्हे, तर मानवी प्रवृत्ती, मूळ स्वभाव आणि प्रलंबित असलेल्या कामांवरही मिश्किल वाक्यांमधून भाष्य करण्यात आले.
संगीत नाटकाच्या शेवटाकडे जाताना मानवाच्या निसर्गाविषयी असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. अलीकडे ये याला पलीकडे ने माणसा.. हा संवर्धनाचा वारसा.. हा संदेश प्रेक्षकांच्या थेट हृदयाला हात घालून गेला. कलाकारांच्या कसदार अभिनयाला आणि उपरोधिक संवादांना उपस्थितांनी हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
या संगीत नाटकात मकरंद भास्कर सावंत (अप्पा), प्रतीकेश मोरे (गिधाड) आणि ऋतुजा गद्रे यांनी भूमिका केल्या. निहारिका भिडे, अवंतिका चौगुले आणि केतकी कुंभारे (नृत्य) वेदांत जाधव, तुलसी कोल्हे आणि गौरी डोंगरे (गायन), साहील परब (संगीत संयोजन), यश खडे आणि मानव वारंग (संगीत व वादन), योगेश गोंधे (प्रकाश), श्रेयस आणि टीम (ध्वनी), डॉ. अभिषेक साटम (वेशभूषा) यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. माधवी देवळेकर आणि कुणाल चव्हाण यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिले.
गिधाडांचे संवर्धन ही काळाची गरज असून, या संमेलनामुळे पक्षी रक्षणाच्या मोहिमेला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचलन गौरी जोशी यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी