
वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।कुख्यात ड्रग्ज माफिया नेमेसियो ओसेगुएरा उर्फ ‘एल मेंचो’ यांच्या मृत्यूनंतर मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला आहे. त्यांच्या मृत्यूमागे अमेरिकेची भूमिका होती का, याबाबतही अटकळी वाढल्या आहेत. मेक्सिकोच्या लष्कराने रविवारी जलिस्को राज्यातील टापाल्पा भागात विशेष मोहिम (ऑपरेशन) राबवून जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल या अंमली पदार्थांच्या टोळीचा प्रमुख एल मेंचो याला जखमी केले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या कारवाईत कार्टेलचे (अंमली पदार्थ तस्करांचे जाळे) चार सदस्य ठार झाले, तर तीन जण जखमी झाले होते. मोहिमेदरम्यान लष्करावर हल्ला करण्यात आला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षादलांनी कारवाई केली. ही कारवाई सीजेएनजी विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे. कारण ही टोळी फेंटानिल (तीव्र वेदनाशामक कृत्रिम अंमली पदार्थ), मेथॅम्फेटामाइन (उत्तेजक कृत्रिम अमली पदार्थ) आणि कोकेन (अंमली पदार्थ) यांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर सहभागी होती. विशेषतः अमेरिकेत या टोळीने मजबूत जाळे उभे केले होते.
एल मेंचोच्या मृत्यूनंतर टोळीच्या सदस्यांनी सूड कारवाया सुरू केल्या. मेक्सिकोतील अनेक राज्यांमध्ये रस्ते अडवण्यात आले, वाहनांना आग लावण्यात आली आणि हिंसक चकमकी घडल्या. पोर्तो वल्लार्टा आणि ग्वाडालजारा यांसारख्या भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या असून नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पर्यटक अडकले असून विमानतळांवर गोंधळाचे वातावरण आहे.
एल मेंचोच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त संदेश लिहिला. त्यांनी म्हटले, “वी आर विनिंग टू मच” (आपण खूपच जास्त जिंकत आहोत). या विधानामुळे या कारवाईत अमेरिकेच्या सहभागाबाबतचा संशय अधिक गडद झाला आहे.
व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, या मोहिमेसाठी अमेरिकेने गुप्त माहिती पुरवली होती. त्या म्हणाल्या, “एल मेंचो अमेरिका आणि मेक्सिको दोन्ही देशांसाठी मोठा धोका होता. फेंटानिल तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे.”
अमेरिकेने एल मेंचोवर १५ दशलक्ष डॉलर (१५० लाख अमेरिकन डॉलर्स) इतके बक्षीस जाहीर केले होते आणि सीजेएनजी ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. ट्रम्प प्रशासन दीर्घकाळापासून मेक्सिकोवर अंमली पदार्थांच्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यामुळे एल मेंचोचा मृत्यू हा ट्रम्प यांच्यासाठी एक महत्त्वाचा कूटनीतिक विजय मानला जात आहे.सध्या मेक्सिकोतील परिस्थिती तणावपूर्ण असून हिंसा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode