
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)सफाळे येथील विटीलाईन मुख्य रस्त्यावर मुजबादेवी मंदिराजवळ झालेल्या अपघातात विराथन बुद्रुक येथील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात घडवून अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सफाळे पोलीस घेत आहेत.
सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विराथन बुद्रुक वैतीपाडा येथील जयवंत वैती (वय ४५) आणि पांडुरंग पाटील (वय ५५) हे कामावरून दुचाकीने घरी परतत होते. त्यांची दुचाकी मुजबादेवी मांडे मंदिराजवळ आली असता, मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात जयवंत वैती यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पांडुरंग पाटील यांच्या डोळ्याला जबर इजा झाली आहे.
अपघातानंतर अज्ञात इसम टेंभीखोडावे दिशेने पळून गेला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी माकणे येथील स्वास्तिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघात घडवून पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL