
पालघर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत ‘निपुण महाराष्ट्र’ व ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान’ सन २०२५-२६ अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ वीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद, पालघर येथे उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदशाळेच्या मुलांसाठी ‘कॉफी विथ सीईओ’ ही कार्यक्रमाची विशेष थीम होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच ‘हिंद की चादर’ या च्या गीताने करण्यात आली. त्यानंतर डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी प्रस्तावना सादर करत उपक्रमामागील उद्दिष्टे, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती आणि गुणवत्तावाढीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत एकूण २३ शाळांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ‘सुपर शाळा’ म्हणून शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ९ शाळा तसेच ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या १४ शाळांचा समावेश होता. ‘निपुण पालघर’ अंतर्गत ८ शिक्षक आणि ९ शाळांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, ‘इन्स्पायर अवॉर्ड’मध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी, तसेच मागील दोन वर्षांत राज्यस्तर किंवा जिल्हास्तरावरील कला, क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक अशा सर्वांचा यात समावेश होता.
स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन प्राप्त केलेल्या ८ शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, साबणाने हात धुण्याची सवय, ऑपरेशन व देखभाल, वर्तन बदल आणि क्षमता बांधणी या प्रमुख निकषांवर आधारित सखोल मूल्यांकनानंतर शाळांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL