आमदार खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षेची काँग्रेसची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार दबाव आणत तात्काळ ‘वाई प्लस’ (Y+) दर्जाच
Photo


अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या गंभीर प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार दबाव आणत तात्काळ ‘वाई प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याची आक्रमक मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत संताप व्यक्त केला.

“लोकप्रतिनिधींनाच धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडे गुन्हेगारी टोळ्यांकडून, विशेषतः कथित बिश्नोई गँगकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या घटनांनी राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार पठाण यांना मिळालेली धमकी ही केवळ एका व्यक्तीविरुद्धची बाब नसून लोकशाही व्यवस्थेलाच दिलेले आव्हान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

निवेदनात आमदार पठाण यांना तात्काळ उच्चस्तरीय पोलीस सुरक्षा देण्याची, विद्यमान सुरक्षेचा आढावा घेऊन ‘वाई प्लस’ दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तसेच धमकी देणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधण्याचीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यावेळी बबनराव चौधरी, प्रदीपकुमार वखारिया, कपिल रावदेव, तश्वर पटेल, मो. युसुफ मो. इलियास, विजय पचारे, मोहम्मद इरफान, शे. इब्राहिम शे. कासम, याकूब खान, हुसेन चौधरी, मोईन खान, मेहबूब खान, आर्किटेक निलोफर खान सोहेल खान, निखत शाहीन अहमद कुरेशी, कनिश खातून मो. इलियास, आर्शिया परवीन मो. शारिक, सैय्यद यासीन, शेख अब्दुल्लाह, सैय्यद अहमद, सैय्यद शहजाद सज्जू भाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande