

अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने १० कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
आमदार पठाण यांना १७ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने १० कोटी रुपयांची उघड मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारू, अशी थेट धमकी देण्यात आली. “पोलिसांना सांगितले तरी काही उपयोग नाही; काही महिन्यांनी आम्ही काम तमाम करू,” अशा शब्दांत आमदारांना धमकावण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी संतापाने सांगितले.
सभागृहात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल? दिवसाढवळ्या धमक्या दिल्या जात आहेत. गँगस्टरचे नाव घेऊन आमदारांना लक्ष्य केले जाते, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.” धमकीचा ऑडिओ ऐकला तर अंगावर काटा येतो, असेही त्यांनी नमूद केले.
साजिद पठाण यांचा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार झोपले आहे का? लोकप्रतिनिधींनाच संरक्षण नसेल तर राज्य चालवायचे कसे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी सरकारला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. संबंधित आमदारांना कडक सुरक्षा देऊन धमकी प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी सभागृहातून करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे