
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घरी पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यानंतर एका शासकीय कर्मचाऱ्याने तात्काळ उपचारासाठी वाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धाव घेतली. मात्र तेथे अँटी-रेबीज सिरम (एआरएस)उपलब्ध नसल्याचे सांगत पुढील उपचारांसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे पाठविण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे डहाणू उपजिल्हा रुग्णालयातही आवश्यक रेबीज प्रतिबंधक सिरम उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर, “येथे औषध नाही; उपचारासाठी गुजरात मधील रुग्णालयात जा,” असा सल्ला देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या राज्याची वाट धरावी, अशी वेळ प्रशासनाने आणल्याचे चित्र दिसून येते.
रेबीज हा अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार असून लक्षणे दिसल्यानंतर तो जवळजवळ शंभर टक्के प्राणघातक ठरतो. त्यामुळे कुत्रा किंवा अन्य प्राण्याच्या चाव्यानंतर लसीसोबत एआरएस देणे अत्यावश्यक असते. एआरएस शरीरात तात्काळ संरक्षण निर्माण करून विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करते.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्येच हे औषध गेल्या दोन महिन्यांपासून उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दोन महिने औषध साठा नसणे म्हणजे नियोजनाचा पूर्ण अभाव की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे महोत्सव, कार्यक्रम आणि दिखाऊ उपक्रमांमध्ये प्रशासन गुंतलेले दिसते, तर दुसरीकडे ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवा अक्षरशः कोलमडल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून तात्काळ अँटी-रेबीज सिरमचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच औषध साठ्याची माहिती सार्वजनिक करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणेही तितकेच गरजेचे आहे. बाजारात सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या या औषधाचा साठा नेमका कधी संपला किंवा संपवला गेला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL