
रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचा संदेश कीर्तनातून देणाऱ्या गाडगे महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रबोधन सामाजिक सेवा संस्था, अलिबाग-रायगडचे डॉ. मिलिंद पाटील यांनी आपल्या मनोगतातून गाडगे महाराजांचे समाजसुधारणेतील मोलाचे योगदान बंद्यांसमोर मांडले. विसाव्या शतकात त्यांनी गावागावांत फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध प्रभावी लढा उभारला, याची माहिती त्यांनी दिली.
स्वच्छता ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, शरीर आणि परिसर यांचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. बंद्यांनी आपल्या राहत्या जागेची स्वच्छता राखून सकारात्मक विचार जोपासावेत, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, कारागृह शिपाई रविंद्र वाघमारे, प्रशांत पाटील तसेच प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे बंद्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागर निर्माण होण्यास मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके