
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)भिगवण जलाशयावर भल्यापहाटे फ्लेमिंगो पक्षांचा जणू कुंभमेळाच भरत आहे. शेकडो पक्षी आकाशात झेपावतात तेव्हा अग्निपंखांचे विलोभनीय दर्शन होत आहे. हा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी तेथे पक्षीप्रेमींची गर्दी होत आहे. भिगवण जलाशयात यंदा पाणी भरपूर असल्याने हे पक्षी नेहमीपेक्षा उशिरा आले आहेत. पाणी उथळ होताच. शेकडो पक्ष्यांचे आगमण या ठिकाणी झाले. यात फ्लेमिंगो जास्त असल्याने लक्ष वेधून घेत आहेत. उजनी धरण परिसरातील बॅकवॉटरमध्ये विशेषतः कुंभारगाव परिसरात मोठ्या संख्येने फ्लेमिंगोचे थवे दिसून येत आहेत.
जानेवारीच्या सुरुवातीला जलपातळीत झालेल्या चढ-उतारामुळे पक्ष्यांचे दर्शन मर्यादित होते. मात्र, आता पक्ष्यांची संख्या हळूहळू वाढत असून फेबुवारी आणि मार्च महिन्यात फ्लेमिंगोंची सर्वाधिक उपस्थिती अपेक्षित आहे. याच काळात विविध स्थलांतरित पक्ष्यांचाही वावर वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु