
लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या तीन तासांत छडा लावत पोलिसांनी ९ तोळे सोन्याचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादीचाच मुलगा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात CR No. 30/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(A), 331(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सुनिता दगडु भामरे (वय 50, रा. भाडगाव ता. जि. लातूर) यांनी 23 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्यांनी नमूद केले होते. चोरीमध्ये गंठन, सहा अंगठ्या, बोरमाळ, सरपाळे आणि दोन झुमके असा एकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थानिक माहितीदार, संशयितांची पडताळणी व तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान प्रशांत दगडु भामरे (वय 30, रा. भाडगाव) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. आरोपी हा फिर्यादीचा मुलगा असून घरातील परिस्थितीची माहिती असल्याने त्यानेच चोरी केल्याचे उघड झाले. चोरी केलेले दागिने त्याने स्वतःच्या घरातील कपाटात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 100 टक्के मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने लातूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे करीत आहेत.
या कारवाईत सहाय्यक फौजदार संजय फुलारी, बालाजी चव्हाण, वाजीद चिकले, संतोष हजारे, बालाजी यादव, संतोष थोरात, मुकेश कोळी, सतीश लामतुरे, नितीन पाटील यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis