
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील चकलांबा येथीलप्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल आरोग्य विभागाच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील गट नं. ११६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होती. याच गटात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुनी इमारत रिकामी करण्यात आली होती. ही जुनी इमारत मुख्य रस्त्यावर असल्याने, जागेवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने काही लोकांनी तिचा गैरफायदा घेत इमारत पाडूनटाकली.या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी चौकशी समिती नियुक्त करत सदरील समितीला चकलांबा येथे पाठवले. समितीने केलेली पाहणी व चौकशीअंती इमारतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गेवराईचे तालुका आरोग्य अधिकारी अभयकुमार गोंदीकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis