बीडमध्ये घरफोडी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील तिघांना अटक
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीतील तीन आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून
बीडमध्ये घरफोडी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील तिघांना अटक


बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : पाटोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीतील तीन आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पाटोदा येथील घरफोडीप्रकरणातील संशयित आरोपी मोटारसायकलवरून साकत मार्गे जामखेडकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाटोदा परिसरात सापळा रचला. महासांगवी (ता. जि. बीड) शिवारात आरोपी दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, आरोपींकडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.दरम्यान, या टोळीने इतरही घरफोडीचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande