
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला तसेच आंबा, डाळिंब, द्राक्ष, टरबूज आदी फळपिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड आदी तालुक्यांतील अनेक भागांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अतिवृष्टी व गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अक्षरशः नुकसान झाले असून फळबागांनाही मोठा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. परभणी जिल्ह्यासह राज्यातील ज्या ज्या भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व जिल्ह्यांतील प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिले जातील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. दरम्यान, विविध आमदारांनीही या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis