
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. आय फॉटेस्ट अर्थात आंतरराष्ट्रीय पर्यावरण, शाश्वतता आणि तंत्रज्ञान मंच या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सहकार्याने ‘रत्नागिरी जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा’ सादर केला.
जिल्हा विकास नियोजनात हवामान बदल उपाययोजनांचा समावेश करणारा हा देशातील पहिलाच पथदर्शी उपक्रम ठरला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते या आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. “हवामान बदलाचा परिणाम मत्स्यव्यवसाय, शेती आणि पायाभूत सुविधांवर होत असून, त्याला सक्रिय प्रतिसाद देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.आराखड्यानुसार, शतकाच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील तापमान २.३ ते ३.३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे २०५० पर्यंत सुमारे एकतृतीयांश गावे पूरप्रवण क्षेत्रात जाऊ शकतात, तर १६७ गावे भूस्खलनाच्या धोक्यात आहेत. समुद्रपातळी वाढीमुळे किनारी मासेमारी वस्त्यांनाही धोका निर्माण होणार आहे.
यावर उपाय म्हणून हवामान-लवचीक शेती, सौर व पवन ऊर्जेचा वाढता वापर, सौर-आधारित कोल्ड चेन, तसेच रस्ते व पूल यांचे ‘क्लायमेट प्रूफिंग’ करण्याच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १९ गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची क्षमता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘जिल्हा हवामान कक्ष’ आणि ‘जिल्हा हवामान वित्त मंच’ स्थापन करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. स्थानिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल साधणारा हा आराखडा रत्नागिरीसाठी नव्या विकासदिशेचा मार्गदर्शक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी