
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद तसेच दिव्यांग शाळा व कर्मशाळांच्या संयुक्त विद्यमाने आज इंदिरा गांधी स्टेडियम येथे दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 चे उद्घाटन उत्साहात पार पडले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय डॉ. रविंद्र चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन पक्वान्ने, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी रावसाहेब चकोर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लांडे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धांचा मुख्य उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. खेळाच्या मैदानावर प्रत्येक खेळाडू समान असतो. समाजाने दिव्यांगांच्या क्षमतांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत दिव्यांग भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या 5 टक्के शेष निधीतून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. झिरो टू सिक्स वयोगटातील दिव्यांगांसाठी आर्थिक मदत, दैनंदिन दिनचर्येसाठी काळजीवाहक निर्वाह भत्ता, सहाय्यक उपकरणांसाठी अनुदान, विनाअट घरकूल योजना, चालण्यात असमर्थ दिव्यांगांसाठी ॲडॉप्शनसह स्कूटर, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य अशा पुनर्वसनाभिमुख योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 शाळांमधील एकूण 533 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. धावणे, गोळाफेक, लांब उडी अशा विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रल्हाद लांडे यांनी दिली. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभही मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis