भारत–स्वित्झर्लंड संसदीय मैत्री गटावर डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संसदीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारताच्या संसदेच्या वतीने भारत–स्वित्झर्लंड संसदीय मैत्री गट स्थापन करण्यात आला आहे. १८व्या लोकसभेच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या
भारत–स्वित्झर्लंड संसदीय मैत्री गटावर डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती लोकसभा सचिवालयाकडून अधिकृत पत्र; १८व्या लोकसभेसाठी गटाची स्थापना


अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संसदीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारताच्या संसदेच्या वतीने भारत–स्वित्झर्लंड संसदीय मैत्री गट स्थापन करण्यात आला आहे. १८व्या लोकसभेच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण गटावर राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला यांनी डॉ. बोंडे यांची या संसदीय मैत्री गटावर निवड केली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र L. V. Ramana, संचालक, लोकसभा सचिवालय (कॉन्फरन्स अँड प्रोटोकॉल शाखा) यांनी जारी केले असून, ही नियुक्ती संसदीय राजनयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.भारत–स्वित्झर्लंड संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संसदीय संवाद, परस्पर सहकार्य आणि विश्वास वृद्धिंगत करणे हा आहे. या गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील खासदारांमध्ये थेट संवाद, परस्पर दौरे, चर्चासत्रे, तसेच धोरणात्मक विषयांवर विचारविनिमय होणार आहे. व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, नवोपक्रम, पर्यावरण, आरोग्य व सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

डॉ. अनिल बोंडे यांची या गटावर झालेली नियुक्ती ही विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. संसदीय अनुभव, अभ्यासपूर्ण भूमिका आणि राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय विषयांवरील सखोल जाण यामुळे ते या गटात प्रभावी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करताना भारत–स्वित्झर्लंड संबंधांना नवी दिशा देण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बोंडे यांनी देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande