दुर्गव्यवस्थापन म्हणजे प्रशासन, जलव्यवस्थापन, संरक्षण नीती आणि भूगोलाचा समन्वय आहे - डॉ. सचिन जोशी
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : शिवाजी महाराजांचे दुर्गव्यवस्थापन ही केवळ लष्करी संकल्पना नसून, ती प्रशासन, जलव्यवस्थापन, संरक्षण नीती आणि भूगोल यांचा समन्वय आहे, असे प्रतिपादन पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेतील दुर्ग अभ्या
शिवकालीन दुर्गव्यवस्थापन व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी


रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : शिवाजी महाराजांचे दुर्गव्यवस्थापन ही केवळ लष्करी संकल्पना नसून, ती प्रशासन, जलव्यवस्थापन, संरक्षण नीती आणि भूगोल यांचा समन्वय आहे, असे प्रतिपादन पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेतील दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित दुर्गव्यवस्थापनाविषयीच्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि प्रमुख वक्ते डॉ. सचिन जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. जोशी यांनी ‘शिवकालीन दुर्ग व्यवस्थापन व किल्ले’ या विषयावरील आपल्या व्याख्यानातून शिवकालीन दुर्ग व्यवस्थापनाचा अभ्यासपूर्ण व चिकित्सक वेध घेत संशोधनाधिष्ठित विवेचन केले. किल्ल्यांच्या उभारणीतील कालानुक्रमिक टप्प्यांचा ऊहापोह करताना त्यांनी प्रारंभीच्या डोंगरी किल्ल्यांपासून ते सागरी किल्ल्यांपर्यंत झालेल्या स्थापत्यकला विकासाचा मागोवा घेतला.

किल्ल्यांच्या रचनेतील बुरूज, तटबंदी, खंदक, भव्य दरवाजे, माची, पाण्याची टाकी यांसारख्या घटकांचे कार्य आणि त्यामागील रणनीती त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. विशेषतः पाण्याच्या टाक्यांची रचना व साठवण व्यवस्था दीर्घकालीन वेढ्याच्या परिस्थितीत किती महत्त्वाची ठरायची, यावर त्यांनी विश्लेषण केले. काही किल्ल्यांमध्ये आढळणारा युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभावही त्यांनी दाखवून दिला. त्यातून शिवकालीन व्यवस्थापनातील व्यावहारिकता आणि नवोन्मेषी दृष्टी स्पष्ट व्हायला मदत झाली.

शिवचरित्राच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या अस्सल साधनांचा संदर्भ देताना त्यांनी सुमारे २५० पत्रे, विविध बखरी आणि युरोपियन प्रवासी व अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांचा उल्लेख केला. इतिहासलेखन करताना साधनांचे चिकित्सक परीक्षण महत्त्वाचे आणि आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. जोशी यांनी रायगडावरील अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या अवशेषांचे पुरातत्त्वीय दृष्टीने विश्लेषण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व दुरुस्त केलेल्या किल्ल्यांची संख्या सुमारे १९० असल्याचे नमूद करताना दुर्गरचनेतून दिसून येणाऱ्या नियोजनबद्धतेचा आणि दूरदृष्टीचा गौरव केला.

प्राचार्य डॉ. साखळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने व रणनीतिपूर्वक लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातून ही प्रेरणा घेण्याचे आवाहन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे आणि आत्मपरीक्षणातून नीतिमूल्यांचे पालन करावे हेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ठरेल, असे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासून ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी सजग नागरिक म्हणून कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande