
रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अभियानाची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी भेट दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम व कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी व आरोग्य सुविधा, शेतकरी व स्थानिक उद्योजक सक्षमीकरण, घरकुल योजना, सौर ऊर्जेचा वापर तसेच डिजिटल शाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाडगाव ग्रामपंचायतीने या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदर्श निर्माण केला आहे.
भेटीदरम्यान सरपंच सारिका पवार, माजी सरपंच सरिता भगत व उपसरपंच जयेंद्र भगत यांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. ग्रामपंचायत कार्यालयात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग तसेच जिल्हा परिषद अधिकारी उपस्थित होते.
नेहा भोसले व प्रियदर्शनी मोरे यांनी ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेची प्रत्यक्ष पाहणी केली. कचरा वर्गीकरण, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच डिजिटल शाळेतील सुविधांचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक शेतकरी व उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन व योजनांबाबतही त्यांनी माहिती घेतली.
वाडगाव ग्रामपंचायतीने समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत केलेल्या कामाचे कौतुक करत हे मॉडेल इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके