
परभणी, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। परभणी शहरातील मध्यवर्ती वस्तीत सध्या जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नानलपेठ येथील मुख्य रस्त्यावर काहात कॉर्नर समोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याने परिसरातील परिस्थिती बिकट झाली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे येथील नाले तुंबले असून नाल्यातील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा नसतानाही रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी नमूद केले. महापालिकेने तात्काळ कचरा उचलून नालेसफाई करावी तसेच नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis