‘माझी वसंधरा’ 5.0 मध्ये नावझे ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या ‘माझी वसंधरा’ अभियान संवर्धन 5.0 अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पालघर तालुक्यातील नावझे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार नुकता
‘माझी वसंधरा’ 5.0 मध्ये नावझे ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक


पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या ‘माझी वसंधरा’ अभियान संवर्धन 5.0 अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पालघर तालुक्यातील नावझे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार नुकताच मुंबई येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे सचिव तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील वरळी येथे हा कार्यक्रम पार पडला.

‘माझी वसंधरा’ उपक्रमांतर्गत नावझे ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालून कापडी पिशव्यांच्या वापरासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व ई-कचरा संकलन यांसारख्या स्वच्छता कार्यक्रमांत नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला.

घनकचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खतनिर्मिती, तसेच बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचऱ्याचे उपयुक्त रूपांतर करण्यात आले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गावात लाऊडस्पीकर व डीजेवर निर्बंध घालण्यात आले, तर फटाक्यांवर बंदी घालून पर्यावरणपूरक क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली. बीज संकलन, ‘झाडे लावा–झाडे जगवा’ मोहीम, रस्त्याच्या कडेला देशी वृक्षांची लागवड अशा हरित उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याचे सरपंच दामोदर सकऱ्या लाबड यांनी सांगितले. या उपक्रमांच्या अंमलबजावणीत गटविकास अधिकारी संजय भुरा, उपसरपंच प्रफुल्ल पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मानस मयूर लाटे तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष योगदान लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande