पालघर- मायखोप गावात होळी उत्सव नवे उपक्रम घेऊन साजरा होणार
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)फाल्गुन महिन्यात येणारा होळी सण आनंद, उत्साह आणि एकोपा वाढविणारा मानला जातो. महाराष्ट्रात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या या सणाला पालघर जिल्ह्यातील आगरी समाजात विशेष महत्त्व आहे. गावकरी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने, जल्लोषात ह
केळवारोड येथील मायखोप गावात होळी उत्सव नवे उपक्रम घेऊन साजरा होणार


पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)फाल्गुन महिन्यात येणारा होळी सण आनंद, उत्साह आणि एकोपा वाढविणारा मानला जातो. महाराष्ट्रात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या या सणाला पालघर जिल्ह्यातील आगरी समाजात विशेष महत्त्व आहे. गावकरी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने, जल्लोषात हा उत्सव साजरा करतात. प्रत्येक गावात सार्वजनिक होळी असतेच, तर अलीकडच्या काळात पाड्यापाड्यातही होळीका दहन केले जात आहे.

मायखोप गावात यंदा होळी उत्सव नव्या उपक्रमांसह साजरा होणार आहे. गावातील समाजसेवक रामदास पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा सर्वसामान्यांसाठी असामान्य ठरत आहे. या होळीत सहभागी होणारा कोणीही उपाशीपोटी परत जाणार नाही, अशी भोजनव्यवस्था करण्यात येते. यंदा २ मार्च रोजी होणाऱ्या होळी उत्सवात आणखी एक नवा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. माजी सरपंच करुणा रामदास पाटील, स्नेहा पाटील, दत्तात्रेय भोईर, निलेश पाटील, कलाकार भोईर, अक्षय भोईर, कैलास पाटील, दशरथ घरत, जालिंदर पाटील यांच्यासह समस्त कार्यकारी मंडळ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहे.

आगरी समाजातील रुढी-परंपरा जपण्याच्या उद्देशाने ‘साहित्य कवीकट्टा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. लग्नसमारंभात धवलारिणी ज्या पद्धतीने पारंपरिक गीते गातात, त्याच धर्तीवर होळीच्या रात्री होळी गीत, कविता आणि सादरीकरणाचा छोटेखानी कवीकट्टा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक धवलारिणीचा गौरव करण्यात येणार असून, गावातील लेखक व कवींचाही सन्मान केला जाणार आहे. या अनोख्या आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या होळी उत्सवात परिसरातील आगरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande