
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। पालघर शहरालगत असलेल्या सुंदरम शाळेजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरवर छापा टाकून पालघर स्थानिक गुन्हे शाखाने या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कॉल सेंटरमधून आर्थिक व सायबर फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कारवाईदरम्यान पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून काही लॅपटॉप व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मीरा रोड-भाईंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदा कॉल सेंटरचे लोण आता पालघरपर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. पालघर शहरालगत सुंदरम परिसरात वेगाने नागरीकरण वाढत असून, त्याचबरोबर परप्रांतीयांचे लोंढे येथे स्थायिक होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांचे पेव फुटत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सुंदरम परिसरातील सुंदरम शाळाच्या लगत असलेल्या ‘फिया एकांत’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणाहून अमेरिका देशाच्या नावाखाली आर्थिक व सायबर फसवणुकीचे प्रकार राबवले जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या कॉल सेंटरचे जाळे किती व्यापक आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL