
इस्लामाबाद , 24 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अदियाला कारागृहातून पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) येथे नेण्यात आले. उजव्या डोळ्यात सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लूजन (CRVO) या आजाराने त्रस्त असलेल्या इमरान खान यांना अँटी-VEGF इंजेक्शनचा दुसरा डोस देण्यात आला.
माहितीनुसार, इमरान खान यांना रावळपिंडी येथील अल शिफा आय हॉस्पिटलचे रेटिना तज्ज्ञ डॉ. नदीम कुरेशी आणि पीआयएमएसच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. मुहम्मद आरिफ खान यांनी पीआयएमएसच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे इंजेक्शन दिले. दरम्यान, इमरान खान गेल्या वर्षी जुलैपासून उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जात आहेत. इंजेक्शन देण्यापूर्वी त्यांची ईसीजी आणि ईसीएचओ तपासणी करण्यात आल्याची माहिती पीआयएमएस प्रशासनाने दिली असून, या चाचण्यांचे निष्कर्ष सामान्य आढळल्याचे सांगितले आहे. मात्र, डोळ्यात इंजेक्शन देताना हृदयाच्या तपासणीसाठी ईसीजी आणि ईसीएचओ चाचण्या का करण्यात आल्या, याबाबत पीआयएमएसने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
पीआयएमएसने पुढे सांगितले की, इंजेक्शननंतर आवश्यक वैद्यकीय सल्ला देऊन इमरान खान यांना पुन्हा कारागृहात परत पाठवण्यात आले. याच महिन्यात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बॅरिस्टर सलमान सफदर यांची इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी ‘अमिकस क्युरी’ म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी सलमान सफदर यांनी न्यायालयाला सांगितले होते की, इमरान खान यांना उजव्या डोळ्याने केवळ १५ टक्केच दिसत आहे.
इमरान खान यांच्या पक्षाने, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने, त्यांना कारागृहातून रुग्णालयात दाखल करण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केले होते. तथापि, पाकिस्तान सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात पीआयएमएस आणि अल शिफा आय हॉस्पिटलचा नव्याने सादर केलेला वैद्यकीय अहवाल ठेवण्यात आला. या अहवालात २४ जानेवारी रोजी अँटी-VEGF इंजेक्शनचा पहिला डोस दिल्यानंतर त्यांच्या उजव्या डोळ्याच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode