
इस्लामाबाद, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातम्या समोर येत आहेत. सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर गोंधळ उडाला. त्यांना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस – ( पीआयएमएस) येथे नेण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की त्यांना इंजेक्शन देण्यासाठी आणले होते. मात्र, यावर इमरान खान यांच्या कुटुंबीयांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
इमरान खान यांच्या बहिणीने एक निवेदन जारी करून सरकारवर निशाणा साधला आहे. या निवेदनात म्हटले की, आम्हाला माध्यमांतून कळले आहे इमरान खान यांना मध्यरात्री पुन्हा पीआयएमएस येथे नेण्यात आले, कदाचित डोळ्यात दुसरे इंजेक्शन देण्यासाठी. परंतु कायद्यानुसार एखाद्या कैद्यावर कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्यापूर्वी कुटुंबाला माहिती देणे बंधनकारक असताना, कुटुंबाला का कळवण्यात आले नाही?
सरकारी वैद्यकीय सुविधांकडून मिळणाऱ्या तपासणी अहवालांवर आम्हाला विश्वास नाही. आधीच अशा बातम्या येत आहेत की पीआयएमएसमधील डॉक्टरांना इमरान खान यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती बाहेर दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली जात आहे. नेमके काय लपवले जात आहे? आमची मागणी कायम आहे की इमरान खान यांची इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार व्हावेत. हे उपचार त्यांच्या खासगी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत व्हावेत.
इमरान खान यांच्या डोळ्यांमध्ये झालेल्या कथित आजारावर पीआयएमएसमध्ये योग्य उपचार होऊ शकत नाहीत. सरकार जे करत आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहे आणि इमरान खान यांच्या विरोधात झालेल्या प्रत्येक उल्लंघन व कथित गुन्ह्याबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode