
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या “मास रेड” मोहिमेत मटका जुगार व गावठी दारू विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आली. शहर व परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी दोन मटका अड्ड्यांवर तसेच दोन गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली असून एकूण चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस पथकाने विविध भागांत एकाचवेळी छापेमारी केली. पहिल्या कारवाईत फिर्यादी पोलीस शिपाई सदाशिव माणिकराव अनंतवार यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून ८५० रुपये रोख रक्कम, मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या तसेच जुगाराशी संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत फिर्यादी पोलीस शिपाई बाळू भुजंगराव कुडमेते (ब.क्र. २४) यांच्या फिर्यादीवरून आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही आरोपी “टाईम ओपन” नावाच्या मटका जुगारावर लोकांकडून पैसे स्वीकारून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत व खेळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिलीप सिरमनवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाईत फिर्यादी पोलीस शिपाई संजय दिगंबर राजने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून दोन प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे ४० लिटर हातभट्टीची गावठी दारू (अंदाजे किंमत ४,००० रुपये) जप्त करण्यात आली. आरोपी विनापरवाना बेकायदेशीररीत्या दारू साठवून विक्री करत असल्याचे आढळले. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
चौथ्या कारवाईतही गावठी दारू विक्री संदर्भात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis