
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली कोंडवाडा विभागाची बैठक घेण्यात आली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान विभागप्रमुखांनी शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचे काम सध्या बंद असल्याची माहिती दिली. यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित एजन्सीला तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. महापौरांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत मोकाट कुत्रे पकडणे व त्यांची नसबंदी मोहीम त्वरीत राबविण्याचे निर्देश दिले. एजन्सीमार्फत लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान, शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis