
१५ दिवसांत हरकती न आल्यास थेट खरेदी
नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी दिंडोरी तालुक्यातील तीन गावांमधील जमीन संपादनाची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. मानोरी, ढकांबे आणि वरवंडी येथील एकूण सुमारे ३६ हेक्टर जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची संमतीपत्रे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. आता संबंधित गट व सर्व्हे क्रमांकांबाबत १५ दिवसांत हरकती मागविण्यात आल्या असून, हरकती न आल्यास खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सिंहस्थ काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने बाह्य रिंगरोडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शहरालगतच्या सुमारे २५ गावांतील जमिनी या प्रकल्पासाठी आवश्यक असून त्याचे संपादन महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. महसूल विभागाने बाजारभावाच्या तुलनेत २५ टक्के अधिक मोबदल्यासह थेट खरेदीचा पर्याय स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे सुमारे ७ हेक्टर, ढकांबे येथे १३ हेक्टर तर वरवंडी येथे १६ हेक्टर जमिनीचे संपादन प्रस्तावित आहे. संबंधित गट निश्चित झाले असून मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. बहुतांश जमीनमालकांनी संमती दर्शविल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी काही गावांमध्ये संपादनास विरोध कायम आहे.
बाह्य रिंगरोड प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सिंहस्थ काळात भाविकांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत.मात्र, काही गावांतील विरोध आणि मालकी हक्कांवरील संभाव्य वाद लक्षात घेता प्रशासनासमोर समन्वयाचे आव्हान उभे राहिले आहे. आगामी १५ दिवसांत प्राप्त होणाजया हरकतींवरून पुढील कार्यवाहीचा वेग निश्चित होणार आहे.
चौकट
हरकती सादर करण्याचे आवाहन
खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी केली जाणार असली तरी सर्व्हे क्रमांक आणि गट क्रमांकांतील मालकी हक्कांबाबत आक्षेप असण्याची शक्यता लक्षात घेऊन हरकती मागविण्यात आल्या आहेत.
जमिनीच्या मालकी हक्कांबाबत कोणत्याही व्यक्तीला आक्षेप किंवा सूचना असल्यास त्यांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक पुराव्यासह सादर कराव्यात. ३. निर्धारित मुदतीत हरकती न आल्यास संबंधित जमिनीवर कोणाचाही दावा नसल्याचे गृहीत धरून थेट खरेदीची कार्यवाही करण्यात येईल, असे दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV