
- आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा करणार भारताचे नेतृत्व
डोंबिवली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे करणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. यावेळी त्यांनी यूएई, सिएरा लिनोन, लायबेरिया, डीआर काँगो या देशांमध्ये भेट दिली होती. आणि ऑपरेशन सिंदुरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये ठामपणे मांडली होती. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विविध पक्षांतील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हुन अधिक देशांचा दौरा करणार आहे.
या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, पी. चिदंबरम, राम गोपाल यादव, टी.आर. बालू, सुप्रिया सुळे, शशी थरूर, अनुराग ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन, मनीष तिवारी, अभिषेक बॅनर्जी, कणिमोळी, गौरव गोगोई यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सारख्या युवा खासदारांपर्यंत व्यापक प्रतिनिधित्व या गटांमध्ये दिसून येत आहे.
यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि यूएई अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi