परभणी - मालमत्ता करातील वाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.) - मानवत नगर परिषदेने मालमत्ता करामध्ये केलेली मोठी वाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, गोपाळ लाड, प्रकाश करपे, बालाजी पोकळे, र
मालमत्ता करातील मोठी वाढ तात्काळ रद्द करा मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीची मागणी ः मुख्याधिकार्यांना निवेदन


परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.) - मानवत नगर परिषदेने मालमत्ता करामध्ये केलेली मोठी वाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी मानवत तालुका विकास व रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, गोपाळ लाड, प्रकाश करपे, बालाजी पोकळे, रवि कत्रुवार, रेनकोजी दहे, विलास बारहाते, प्रसाद जोशी, अॅड. किरण बारहाते, अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, अॅड. डी.डी. मगर, डॉ. संजय मुंदडा, सतीश हापसेनकर, मारोती टाक, लक्ष्मण जवादे, प्रल्हाद रासवे, जयप्रकाश मिटकरी, संतोष गलबे आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 24) मानवत नगर परिषद मुख्याधिकारी कोमल सावरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

त्याद्वारे, प्रशासक कार्यकाळात मंजूर झालेल्या करवाढीच्या ठरावानंतर नागरिकांना वाढीव कराच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अचानक व मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव कराबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी 2025-26 अखेरचा कर आधी भरणे बंधनकारक केल्याबद्दल नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

अनेक नोटिसांमध्ये मालमत्ता धारकांच्या नावांमध्ये त्रुटी आढळून येत असून दुरुस्तीसाठी पीटीआर काढण्याची अट व शुल्क आकारणी अन्यायकारक आहे, काही मालमत्तांचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे, असे निवेदनात नमूद करीत वाढीव मालमत्ता कर तात्काळ स्थगित करावा, नाव दुरुस्तीसाठी पीटीआर शुल्क आकारणी थांबवावी, आक्षेप असलेल्या मालमत्तांचे मोजमाप पुनर्परीक्षण करून दुरुस्ती करावी, नगर परिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांकडून मालमत्ता कर वसुली थांबवावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी जिल्हाधिकार्यांकडे करवाढ प्रस्तावास स्थगिती देण्याची मागणी केली असून या विषयावर 27 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेची विशेष सभा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande