छ. संभाजीनगर - महापौर समीर राजूरकर यांचा शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असावी, नागरिकांना अपेक्षित असलेल्या सेवासुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. पालिका कारभार भ्रष
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता असावी, नागरिकांना अपेक्षित असलेल्या सेवासुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला. पालिका कारभार भ्रष्टाचारविरहीत व्हावा असे त्यांनी स्पष्ट केले. नगररचना आणि करवसुली विभागावर त्या दृष्टीने विशेष लक्ष असेल. या विभागांसाठी 'झिरो टॉलरन्स' हे धोरण असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी नगररचना आणि करवसुली विभागाची बैठक घेतली. या वेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. या दोन विभागांसह अन्य विभागांच्या कामात सुधारणा घडवून आणण्यासाठी शंभर दिवसांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाचे काम पारदर्शक असावे, फायलींचा निपटारा गतीने व्हावा, प्रत्येक प्रकरणाचा निर्धारित वेळेत निपटारा व्हावा असे स्पष्ट करताना दर तीस दिवसांनी याबद्दल आढावा घेण्यात येईल. जे अधिकारी कामात सुधारणा करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला.

नगररचना विभागाच्या बैठकीत महापौरांनी बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या फाइल प्रलंबित ठेवू नका. एखाद्या व्यक्तीने नियमानुसार अर्ज सादर केल्यास त्याला निर्धारित वेळेत बांधकाम परवानगी द्या. नवीन मंजूर विकास आराखड्यानुसार मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होत आहेत. या अर्जाचा निपटारा करताना पारदर्शकता ठेवा. फाइल मुद्दाम थांबवून ठेवणे, अनावश्यक त्रुटी काढणे हे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. करवसुली विभागाच्या बैठकीत मालमत्ता कर आकारणीबद्दल चर्चा करण्यात आली. करआकारणी करताना भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. सोसायटीनिहाय करवसुलीची पद्धत राबवता येईल का, याचा अभ्यास करून पुढील बैठकीत त्याचा अहवाल सादर करा. मोठ्या थकबाकीदारांची अद्ययावत यादी तयार करा, असे निर्देश त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande