
पालघर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जव्हार तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळत असला, तरी यंदाच्या आरटीई (शिक्षण हक्क) प्रवेश प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या घरापासून एक किमी अंतराच्या अटीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांपुढे मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी अनेक पात्र विद्यार्थ्यांना आरटीईचा लाभ मिळणे कठीण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरटीईचा उद्देश स्तुत्य असला, तरी स्थानिक परिस्थितीचा विचार न करता लादलेली ही अट ग्रामीण व आदिवासी भागातील पालकांसाठी जाचक ठरत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. “आमच्या परिसरात एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. त्यामुळे पर्याय मर्यादित राहतात,” असे पालक रविंद्र शेवाळे यांनी सांगितले. तर “शहरात शाळांमध्ये नैसर्गिक अंतर जास्त असते. किमान तीन किमीची मर्यादा ठेवली तर योग्य शाळा निवडता येईल,” अशी भूमिका पालक राजेश भोये यांनी मांडली.
यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी तीन किमीची अट होती. मात्र यंदा ती घटवून एक किमी करण्यात आल्याने जव्हार तालुक्यातील अनेक गावांतील पालकांना सोयीच्या व गुणवत्तापूर्ण शाळा निवडताना अडचणी येत आहेत. विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा तालुक्याच्या मुख्यालयापासून किंवा बाहेरील भागात असल्याने ही अट अधिक त्रासदायक ठरत आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, यंदा जव्हार तालुक्यातील शाळांमध्ये सुमारे ४० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. गतवर्षीपेक्षा काही जागांची भर पडण्याची शक्यता असली, तरी एक किमीच्या नियमामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
“योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात लाभ मिळावा, यासाठी स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नियमात बदल करणे आवश्यक आहे,” अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. इंग्रजी शिक्षणासाठी पालकांची धावपळ सुरू असताना, शाळा निवडीचे पर्याय कमी झाल्याने असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL