नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा-मका उत्पादकांचे आमरण उपोषण
नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। नाशिक जिल्हा आणि चांदवड तालुका हे देशातील कांदा उत्पादनाचे बालेकिल्ले. येथील लाल कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळखला जातो. पण आज परिस्थिती अशी आहे की, ज्याने देशाच्या ताटात चव आणली तोच कांदा शेतकऱ्याच्या आयुष्यात अश्
नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा-मका उत्पादकांचे आमरण उपोषण


नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। नाशिक जिल्हा आणि चांदवड तालुका हे देशातील कांदा उत्पादनाचे बालेकिल्ले. येथील लाल कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळखला जातो. पण आज परिस्थिती अशी आहे की, ज्याने देशाच्या ताटात चव आणली तोच कांदा शेतकऱ्याच्या आयुष्यात अश्रू आणतो आहे. प्रति किलो ७ ते ८ रुपये दर. हा दर नाही, हा शेतकऱ्याच्या कष्टांचा अपमान आहे, असा रोष व्यक्त करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चांदवडमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव आणि नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. निवेदन, विनंती, मागण्या… हे शब्द आता शेतकऱ्यांच्या शब्दकोशातून जवळपास पुसले गेले आहेत. कारण वर्षानुवर्षे विनवण्या करूनही न्याय मिळाला नाही. आज प्रश्न केवळ कांद्याच्या दराचा नाही; तर शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्धार यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तो अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर हा कणा मोडला, तर शहरांचा विकासही टिकणार नाही. आज तात्काळ निर्णयाची, ठोस हस्तक्षेपाची आणि न्याय्य धोरणाची गरज आहे. अन्यथा हा ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही. कांद्याच्या अश्रूंना आता न्यायाची धार हवी. नाहीतर इतिहास प्रशासनाला माफ करणार नाही

- डॉ. सयाजीराव गायकवाड, आंदोलनप्रमुख, चांदवड.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande