छ. संभाजीनगर - विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा स
छ. संभाजीनगर - विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू


छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांद्वारे करण्यात येतो.

यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदींचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येतात.

यापूर्वी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी वेळ व खर्च अधिक लागत असल्याने सर्व इच्छुकांना अर्ज करणे शक्य होत नव्हते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेलाही अधिक कालावधी लागत होता.

या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागामार्फत स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://inshi.maharashtra.gov.in येथे ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध आहे.

या प्रणालीद्वारे प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन व अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून प्रक्रियेची कार्यक्षमता व विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.

ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार असून वेळ व खर्चाची बचत होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जाची स्थिती सहजपणे पाहता येणार असून छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्चातही बचत होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande