
रायगड, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशन यांच्या वतीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरुग्णांसाठी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. “एक पाऊल बालरुग्णांच्या निरोगी जीवनासाठी” या संकल्पनेतून आयोजित या शिबिरास पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात नवी मुंबई व ठाणे येथील बाल शल्यचिकित्सक, बाल अस्थिरोग तज्ज्ञ, बाल नेत्ररोग तज्ज्ञ, बाल मेंदू व मज्जासंस्था विशेषज्ञ, स्पीच थेरपिस्ट तसेच पुनर्वसन तज्ज्ञांनी सहभाग घेतला. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील बालकांची तपासणी करून त्यांचे निदान करण्यात आले. ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, अशा बालकांवर नवी मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमासाठी सह्याद्री महिला ग्रामसंघ, बोर्ली पंचतन तसेच आशा आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ठाणे येथील जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट यांनीही सहकार्य करत पुढील उपचारांसाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.
डॉ. राजेश पाचारकर मार्च २०१८ पासून श्रीवर्धन परिसरात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत. मार्च २०२६ पासून दरमहा पाच गरजू नेत्ररुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. या वेळी डॉ. कौस्तुभ केळसकर, डॉ. संतोष नारायणकर, डॉ. किशोर कोठुळे, किशोर नागे, शंकर मयेकर तसेच दिघी सागरी पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष आवटी व इतर मान्यवर उपस्थित होते. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके