
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या कर विभागाची आढावा बैठक आज दि. २४ फेब्रुवारी रोजी महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा व आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीस गटनेते दिलीप ठाकुर, माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माज्जू लाला तसेच महानगरपालिका प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, कर अधीक्षक, कर निरीक्षक व वसुली लिपिक उपस्थित होते. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. कर वसुलीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘अभय योजने’ची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी थकबाकी कर भरण्यास पुढाकार घ्यावा, यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचेही सांगण्यात आले. तसेच प्रभाग समितीमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जी होऊ नये, सेवा विहित कालावधीतच पुरविण्यात याव्यात, याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis