
पुणे, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरताना फक्त भाजपच्याच उमेदवारांचे अर्ज सादर झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होणार आहे. या निवडणुकीत भाजपने महिलांना जास्त संधी दिली आहे. या पदाची निवडणूक २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. त्यानंतर विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, नाव समिती यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी मुदत होती.यात भाजपतर्फे विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी स्वरदा बापट, उपाध्यक्ष पायल तुपे, शहर सुधारणा समिती अध्यक्षपदासाठी स्मिता वस्ते, उपाध्यक्षपदासाठी सपना छाजेड, महिला व बाल कल्याण समितीसाठी अल्पना वरपे, उपाध्यक्ष तन्वी दिवेकर, क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी नारायण गलांडे, उपाध्यक्षपदासाठी दिनेश माथवड, शिक्षण समितीसाठी अरुण राजवाडे, उपाध्यक्ष अतुल तरवडे आणि नाव समितीच्या अध्यक्षपदासाठी पल्लवी जावळे, उपाध्यक्षपदासाठी सुनील पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या सहापैकी चार समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांना संधी मिळाली आहे. तर तीन महिलांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु