पुणे विद्यापीठ कुलसचिव निवडीवरून ‘रणकंदन’
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या नियुक्तीवरून मोठे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, एका ठराविक उम
University Pune SPUU


पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाच्या नियुक्तीवरून मोठे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, एका ठराविक उमेदवारासाठीच प्रशासनाचा अट्टाहास का, असा संतप्त सवाल शैक्षणिक वर्तुळातून विचारला जात आहे. या नियुक्तीवरून अधिसभा सदस्यांसह विद्यार्थी संघटनांनी आता थेट जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पडद्यामागून हालचाली करून एका विशिष्ट व्यक्तीची वर्णी लावण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर अधिसभा सदस्य डॉ. हर्ष गायकवाड यांनी कुलगुरूंना याबाबतचे निवेदन देत या विषयाकडे लक्ष वेधले आहे. ज्या उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे, त्यांच्यावर एका नामांकित महाविद्यालयात गंभीर तक्रारी असून, त्या कारणास्तव त्यांना विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असा दावा या निवेदनात केला आहे.दरम्यान, संबंधित उमेदवाराविरुद्ध त्याच्या मूळ संस्थेने शिस्तभंगविषयक चौकशी समिती नेमली आहे. इतकेच नव्हे, तर संस्थेने विद्यापीठाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्रदेखील मागे घेतले आहे. तांत्रिक आणि नैतिकदृष्ट्या अपात्र ठरत असतानाही, त्याच उमेदवाराला कुलसचिव पदासारख्या जबाबदार खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न विद्यापीठाची प्रतिमा मलीन करणारा ठरेल, असा इशारा डॉ. गायकवाड यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande