
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB), आयुष मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत क्षेत्रीय सह-सुविधा केंद्र – पश्चिम विभाग (RCFC-WR) यांच्या वतीने “व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती शेती व निर्यात संधी” या विषयावर एक दिवसीय ऑन-फिल्ड प्रशिक्षण व खरेदीदार–विक्रेता संवाद मेळावा बळीराजा अॅग्रो फार्म, तन्नू गाव, ता. इंदापूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या प्रशिक्षणात विविध भागांतील ७३ प्रशिक्षणार्थी, प्रगतशील शेतकरी, उद्योजक व युवा कृषी उद्योजकांनी सहभाग नोंदविला.
उद्घाटन सत्रात विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील प्रा. (डॉ.) बापू अवचर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच चार्म्स केम प्रा. लि., पुणेचे संचालक डॉ. मिलिंद होनावर आणि फलोत्पादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. टी. कोळेकर हे विशेष पाहुणे म्हणून लाभले. प्रशिक्षणाचे समन्वयक व RCFC-WR केंद्राचे प्रमुख संशोधक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी प्रास्ताविक केले.
उद्घाटन भाषणात प्रा. (डॉ.) बापू अवचर यांनी सेंद्रिय पद्धतीने औषधी वनस्पतींची व्यावसायिक लागवड करण्याचे आवाहन केले. प्रा. (डॉ.) मोकाट यांनी भारतातील औषधी वनस्पतींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याची गरज अधोरेखित करत जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी, उत्पादन–पुरवठा साखळी बळकट केल्यास ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व शाश्वत उत्पन्नाचे मार्ग खुले होतील, असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. कोळेकर यांनी युवकांनी समूह पद्धतीने आयुर्वेदिक शेतीकडे वळून गावविकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
डॉ. मिलिंद होनावर यांनी सदाफुली, हळद व तुळस यांसारख्या वनस्पतींसाठी दर्जेदार कच्चा माल निर्मिती, सक्रिय घटकद्रव्ये, बाजारातील मागणी व खरेदी–विक्री प्रक्रियेवर मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात प्रा. (डॉ.) मोकाट यांनी शेवगा, सदाफुली, ब्राह्मी, अश्वगंधा, शतावरी, तुळस, काळमेघ, पिंपळी, सर्पगंधा, कोरफड, सफेद मुसळी आदी वनस्पतींची स्थानिक हवामानानुसार निवड, काढणी तंत्र, प्रक्रिया, साठवणूक व मूल्यवर्धन याबाबत सविस्तर माहिती दिली. बळीराजा अॅग्रो फार्मचे संचालक श्री. धनंजय गोसावी यांनी शेवगा लागवड व प्रक्रियेतील संधी–आव्हाने स्पष्ट केली.
खरेदीदार–विक्रेता संवादात डॉ. अक्षय देशमुख (कल्पतरू ग्लोबल एक्सपोर्ट्स एल.एल.पी., पुणे) यांनी कच्चा माल निवड, मागणी व आवश्यक दस्तऐवजांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. जयेश गोसावी यांनी आयात–निर्यात व आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत चर्चा केली.
सहभागी प्रशिक्षणार्थींनी शेवगा, सदाफुली, कोरफड व तुळस लागवडीच्या प्रत्यक्ष शेतभेटी देत प्रात्यक्षिकातून क्षेत्र संकलन पद्धती आत्मसात केल्या.
सेंद्रिय शेती, वैज्ञानिक लागवड, प्रक्रिया, दर्जा नियंत्रण, मूल्यवर्धन व निर्यात संधी या उद्दिष्टांसह शेतकरी–खरेदीदार थेट संवाद साधणे हा प्रशिक्षणाचा केंद्रबिंदू होता. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्रांमुळे कार्यक्रम माहितीपूर्ण ठरला. केंद्रातील डॉ. ताई खरात, श्री. अनिकेत मोकाट व सौ. संध्या देवरे यांनी तांत्रिक सहाय्य केले. सहभागी प्रशिक्षणार्थींनी आयोजनाबद्दल केंद्र व विद्यापीठाचे आभार मानले.
हे प्रशिक्षण पारंपरिक शेतीतून मूल्यवर्धित, निर्याताभिमुख व शाश्वत औषधी वनस्पती शेतीकडे वाटचाल करणारा ठोस टप्पा ठरला. “शेतीतून औषध, औषधातून उद्योग आणि उद्योगातून आत्मनिर्भर भारत” हा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु