
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)सिल्लोड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये काही खासगी व्यापारी शासकीय हमीभावापेक्षा कमी दराने मका, कापूस खरेदी करीत आहेत. ही बाब गंभीर असून, शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. शेती मालाची हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तालुका मका, कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. या दोन पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त आहे. मात्र, सध्या तालुक्यात मका १४००-१५००, तर कापूस ७२००- ७५०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जात आहे. शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने शेतीमालाची खरेदी केली जात आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणास कारणीभूत ठरत आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कर्जबाजारीपणा व वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत हमीभावापेक्षा कमी भाव देणे अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बाजार समिती अंतर्गत सर्व व्यवहार शासकीय नियमांनुसारच होतील याची खात्री करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis