
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेत माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीबाबत प्रशासनाकडे खुलासा मागण्यात आला आहे. जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस आयुक्त, महापौर तसेच सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते उपस्थित होते, तसेच पोलिस विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर एका निवेदनाद्वारे आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.
महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून, सध्या कोणतेही अधिकृत पद नसलेल्या माजी खासदारांना अध्यक्षस्थानी बसवून बैठक घेण्यास कायदेशीर तरतूद आहे का, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत अशा बैठकीसाठी अधिकृत अध्यक्षतेचा अधिकार कोणाला आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, बैठकीस उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि इतर पक्षांचे गटनेते यांना निमंत्रण का देण्यात आले नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. केवळ एका पक्षाशी संबंधित व्यक्तीच्या उपस्थितीत संवेदनशील प्रशासकीय विषयावर बैठक घेणे योग्य ठरते का, असा मुद्दाही उपस्थित केला गेला आहे.
भविष्यात इतर पक्षातील नेते जसे की यशोमती ठाकूर आणि डॉ. सुनील देशमुख यांनी अशा प्रकारची बैठक घेतल्यास प्रशासनाची भूमिका काय असेल, याबाबतही स्पष्टता मागितली आहे. या सर्व मुद्द्यांवर लेखी खुलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी