
रायगड, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। आयुष्यमान डिजिटल मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रायगड जिल्हा रुग्णालयाला राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत मानाचा राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच महाड ग्रामीण रुग्णालय याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नुकताच आयोजित समारंभात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न” पुरस्कार प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मेट्रन गायत्री म्हात्रे तसेच डॉक्टर व परिचारिका यांनी पुरस्कार स्वीकारला. आयुष्यमान डिजिटल मिशनअंतर्गत रुग्णालयात अत्याधुनिक डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून रुग्णांच्या आरोग्यविषयक नोंदी एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. यामुळे उपचार प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि परिणामकारक झाली आहे.
दरम्यान, महाड ग्रामीण रुग्णालयाने ओपीडी, आयपीडी, प्रसूती सेवा, शस्त्रक्रिया, बालक संगोपन व प्रसूतीनंतर माता-बालकांची काळजी या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुरव यांना ग्रामीण भागातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दर्जेदार सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच पनवेल तालुक्यातील कोल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका अर्चना भोईर यांनाही २०२४-२५ या वर्षातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राज्यपातळीवर नवी ओळख मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके