
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 'एक्स्प्लोरआयटी नेक्स्टजेन सोल्युशन्स'च्या सहकार्याने विमान नगर येथील कॅम्पसमध्ये'आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव २०२६'(IYSF 4.0)चे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमासाठी'सिंबायोसिस विधी महाविद्यालय,पुणे'आणि'सिंबायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट' (SCWRM)हे शैक्षणिक भागीदार म्हणून सहभागी झाले होते.
या दोन दिवसीय महोत्सवात कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते,ईएसजी व्यावसायिक,धोरणकर्ते,शिक्षणतज्ज्ञ,संशोधक,विद्यार्थी आणि तळागाळातील संस्थांच्या ६०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यातून हवामान बदलविरोधी कृती,शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रशासन या विषयांवरील संवाद आणि सहकार्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले.
डॉ. विद्या येरवडेकर,प्र- कुलपती,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,यांनी आपल्या स्वागतपर भाषणात'वसुधैव कुटुंबकम्'या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला. जागतिक शाश्वततेसाठी हे एक मार्गदर्शक तत्त्व असून,पृथ्वीप्रती आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. रामकृष्ण रमण,कुलगुरू,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी महोत्सवाच्या पुनर्विचार,संशोधन आणि पुनर्संचयन (Rethink, Research, and Restore)या संकल्पनेला दुजोरा देत,संशोधन-आधारित आणि कृती-प्रवण हवामान उपक्रमांची तातडीने गरज असल्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु