पुणे विद्यापीठात 'रामन मेमोरिअल कॉन्फरन्स'चे आयोजन
पुणे, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातर्फे ''३२ वी रामन मेमोरिअल कॉन्फरन्स'' (RMC-2026) आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २६ आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठ परिसरात पार पडणार आहे. ''श्रॉडेंज
University Pune SPUU


पुणे, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातर्फे '३२ वी रामन मेमोरिअल कॉन्फरन्स' (RMC-2026) आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २६ आणि २७ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठ परिसरात पार पडणार आहे. 'श्रॉडेंजर समीकरणाची १०० वर्षे आणि त्याचा कालजयी प्रभाव' या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद विज्ञान क्षेत्रातील संशोधकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

ही परिषद पूर्णपणे विद्यार्थ्यांद्वारे, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. याचा मुख्य उद्देश तरुण संशोधकांना त्यांचे संशोधन कार्य सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना विज्ञानातील नवनवीन बदलांची ओळख करून देणे हा आहे.

या परिषदेत मटेरिअल सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर फिजिक्स, खगोलशास्त्र आणि अशा अनेक विषयांवर चर्चा व सादरीकरणे होणार आहेत.

या परिषदेबाबत माहिती देताना भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. श्रीकृष्ण सरताळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखला जातो. 'रमण मेमोरियल कॉन्फरन्स २०२६' च्या माध्यमातून आम्ही केवळ शैक्षणिक चर्चाच करत नाही, तर संशोधनाची एक नवी संस्कृती रुजवत आहोत. आजच्या काळात विज्ञानातील आंतरशाखीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि ही परिषद नेमकी तीच गरज पूर्ण करते. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि संशोधकांना मी शुभेच्छा देतो आणि या ज्ञानयज्ञात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करतो.

या दोन दिवसीय परिषदेत ओरल प्रेझेंटेशन, पोस्टर आणि मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पदवीधर, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी ही परिषद विज्ञानातील आधुनिक प्रवाहांना समजून घेण्याची मोठी संधी आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande