
अमरावती, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। तालुक्यातील जामगाव खडका येथे विद्यमान सरपंच सौ. लिलाताई संजय कुमरे यांना कथितपणे अश्लील व अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करून त्यांच्यासमोर धनादेश (चेक) फाडल्याच्या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वरुड तालुक्यातील सरपंच संघटना, बिरसा क्रांती दल तसेच जामगाव खडका व आसपासच्या गावांतील नागरिकांनी एकत्र येत बेनोडा शहीद पोलीस ठाणे येथे भव्य मोर्चा काढला.
माजी सरपंच मनोज पेलागडे यांच्यावर या प्रकरणात आरोप करण्यात आले असून, आंदोलकांनी या प्रकाराला केवळ वैयक्तिक वाद न मानता लोकशाही व्यवस्थेवरील आणि महिला लोकप्रतिनिधीच्या सन्मानावरील हल्ला असल्याचा ठाम आरोप केला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी ठाणेदार विवेक देशमुख यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात सरपंच पदाचा जाहीर अपमान झाल्याने ग्रामपंचायत व्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांनी आरोपीविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही, असा संदेश प्रशासनाने द्यावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली. मोर्चात महिलांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. “महिला सक्षमीकरण केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे,” अशी ठाम मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली.
ठाणेदार विवेक देशमुख यांनी आंदोलकांना आश्वस्त करत सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि कायद्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनाचे नेतृत्व कमलनारायण उईके यांनी केले. यावेळी महादेव माकोडे, अक्षय जाऊरकर, विष्णू गीद, मंगेश गावंडे, संदीप उईके, सुनील चौधरी, महादेव गावंडे, दिगंबर वानखडे,आदींसह शेकडो महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी