
महाराष्ट्रातील ४२९ शाळांपैकी एकमेव निवड
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) । राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या स्कुल क्वालिटी ऍसेसमेंट ऍन्ड ऍश्यूरन्स फ्रेमवर्क (एसक्यूएएएफ) अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले.
मूल्यमापनात शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांची प्रगती, सहशालेय उपक्रम, पायाभूत सुविधा, शाळा व्यवस्थापन आणि समुदाय सहभाग अशा एकूण १२८ मानकांवर काटेकोर व पारदर्शक तपासणी केली गेली. त्यात प्रशालेने ४८८ पैकी ४८२ गुण मिळवून अ+ दर्जा प्राप्त केला.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील १,०२,६६५ शाळांपैकी केवळ ४२९ शाळांना अ श्रेणी बहाल करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील हायस्कूल विभागातून एकमेव निवड होणे ही सगरोळी व परिसरासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. लवकरच राष्ट्रीय स्तरावरील (दिल्ली) मूल्यांकन समिती शाळेला भेट देऊन अंतिम मूल्यांकन करणार असून, सगरोळीची शैक्षणिक गुणवत्ता आता राष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे.
शाळेत ‘एक विद्यार्थी, एक छंद, एक कौशल्य’ या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पूरक उपक्रम गत पाच वर्षांपासून प्रभावीपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत सलग तीन वर्षे विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या या शाळेत विद्यार्थी कला, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश मिळवत आहेत.
शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे असून सुमारे १५०० विद्यार्थी व शिक्षक संकुलात वास्तव्यास आहेत, ज्यामुळे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सदैव अनुकूल वातावरण उपलब्ध आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis