
सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ०५ अन्वये ठराव क्र. ०४ एकमताने मंजूर करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये लागू असलेल्या ‘B-२ (सत्ता प्रकार)’ या नोंदीमुळे मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध आले असून, बांधकाम परवानग्या मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.सदर B-२ (सत्ता प्रकार) उठविण्यात आल्यास मालमत्तांचे व्यवहार सुरळीत सुरू होतील, संबंधित चाळीतील रहिवाशांना मालकी हक्क मिळण्यास मदत होईल तसेच शासनाच्या महसुलात वाढ होऊन महानगरपालिकेलाही कर व शुल्कांच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल, असे मत व्यक्त करण्यात आले. शहरातील अनेक चाळी जीर्ण अवस्थेत असून, हा प्रकार रद्द झाल्यास पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले.या निर्णयासाठी राज्याचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे नमूद करण्यात आले. तसेच शहर मध्यचे आमदार देवेन्द्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असल्याची भावना सभेत व्यक्त करण्यात आली.सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्वसाधारण सभेत या ठरावास मंजुरी देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या निर्णयामुळे शहरातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, प्रलंबित मालमत्ता व्यवहार आणि पुनर्विकास प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड