
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स) नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचनांचे तातडीने निराकरण करण्यासोबतच प्रलंबित कर प्रकरणांवर थेट सुनावणी घेण्यासाठी अमरावती महानगरपालिका तर्फे आयोजित ‘जनसंवाद, समस्या निवारण व कर प्रकरणांची सुनावणी’ या विशेष कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडला. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित प्रश्न, तक्रारी व सूचना यावर संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता, बांधकाम परवाने, मालमत्ता कर, अतिक्रमण, रस्ते दुरुस्ती आदी विषयांवरील अनेक प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः प्रलंबित मालमत्ता कर प्रकरणांवर सुनावणी घेऊन संबंधित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले, तर जटिल प्रकरणांसाठी पुढील कार्यवाहीसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कर विभागातील अधिकाऱ्यांनी थकबाकी, दंड, हप्ते पद्धती व सवलतींबाबत नागरिकांना माहिती दिली.
कार्यक्रमास महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहून आपल्या तक्रारी मांडल्या. थेट संवादाच्या या उपक्रमामुळे प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळत असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की, अशा जनसंवाद कार्यक्रमांचा लाभ घेऊन आपल्या समस्या अधिकृत मार्गाने मांडाव्यात. पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नागरिक–प्रशासन संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रलंबित कर प्रकरणांना गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मनपा प्रशासनाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी