
लातूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।
: देवणीतालुक्यातील नागराळ जंगल परिसरात चोरीच्या तांब्याच्या तारा बाळगणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाणे येथे दि. २२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास देवणीपासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर असलेल्या नागराळ जंगल परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. याप्रकरणी वनरक्षक सुर्यकांत रमेशराव घोगरे देवणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी चंद्रकांत वामन शेल्हाळे (वय २४, रा. शेकापूर, ता. उदगीर) यास ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडून अंदाजे ६ किलो वजनाची तांब्याची तार (किंमत सुमारे ६ हजार रुपये) तसेच टीव्हीएस रायडर कंपनीची मोटारसायकल क्र. एम एच २४-बी एम-९७०८ किंमत सुमारे ६० हजार रुपये असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सपोनि
भिमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरनं ४२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने मजुराचा वेष धारण करून गुप्तरीत्या चोरी केल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत असून, जंगल परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी या गुन्ह्याचा संबंध आहे का, याचा सखोल शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis