
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) परभणीच्या वतीने २४ फेब्रुवारी रोजी ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हाभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
प्रवेश प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, शिष्यवृत्ती वितरण, शुल्कवाढ, वसतिगृह व वाहतूक सुविधा तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत तात्काळ निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्यात यावी, वाढीव परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित कराव्यात, इंटर्न व रेसिडेंट डॉक्टरांचे स्टायपेंड वाढविण्यात यावे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
याशिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील रिक्त पदे तातडीने भरणे, महाविद्यालयीन निवडणुका सुरू करणे, MH-CET प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करणे, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारापासून होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले असून, संबंधित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis