
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्या संदर्भात संबंधित महाविद्यालयांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना बजावले आहेत.
अलिकडे महाविद्यालयीन व संकुलाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी होत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, या संदर्भात विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यातून एका प्रस्तावाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात, असा ठरावही मंजूर करण्यात आला. प्रस्तुत ठरावास अनुसरुन योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने सर्व संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांना स्पष्ट शब्दात कळविले असून विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावे घ्यावेत, विविध विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवावेत, रोजगाराच्या संधी देणारे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, यशवंत विद्याथ्यांच्या मुलाखती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदींसारख्या उपायोजना वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात, या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे संबंधितांना दिले आहेत.
दरम्यान, प्राध्यापक शिकवत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांनी वर्गात येणे बंद केले, असा एक सूर सर्वदुर आहे. पूर्वीची आणि आताच्या स्थितीत मोठ्या प्रमाणावर विसंगती आहे. प्राध्यापक चांगले शिकवित असतील तर विद्यार्थ्यांची तासीकांना गर्दी असायची परंतु, आता प्राध्यापक हे व्यक्तीगत व अन्य संशोधन कृती कार्यक्रमात व्यस्त राहु लागल्यामुळेच अध्यापन हा विषय प्राध्यापकांना गौण वाटू लागला आहे, अशी खंत शैक्षणिक वर्तूळातून सातत्याने व्यक्त होत आहे. जेवढ्या तासीका घेतल्या आणि त्या तासीकांना विद्यार्थ्यांची जेवढी उपस्थिती जास्त, असे धोरण ठरवा, अशी खोचक टिकाही विद्यार्थी संघटनांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis